ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : राबोडी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात मोबाईल फोन हरविल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबोडी पोलीस ठाण्यातील मपोहवा यशोदा घोडे, पोहवा सशांक सावंत, पोना समाधान माळी यांनी हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता मोबाईल फोन कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायर यांच्याशी पत्रव्यवहार करत, या फोनसंबंधी तांत्रिक माहिती मिळवली.
या फोनचा सीईआयआर प्रणालीने शोध घेतला असता, एकूण ४० मोबाईल मिळविण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची एकूण रक्कम ४ लाख १० हजार असून, आज (दि.१०) हे मोबाईल संबंधित फोन मालकांना पोलीस उपआयुक्त शशिकांत बोरोटे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग ठाणे शहर प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे कृष्णा भोये आदी उपस्थित होते.







