बोपगाव अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरण; आरोपीसह पत्नीला अटक

arrest
File Photo

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : कल्याण पूर्व येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सदर मुलीला दुकानातून खाऊ घेऊन परतताना गवळी याने जबरदस्तीने उचलून रिक्षात घालून पळवून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाला ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी विशाल गवळीसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून आरोपीला तर राहत्या घरातून त्याच्या पत्नीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल गवळीचे तीन लग्ने झाली आहेत. तर आरोपीवर चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. विनयभंगासह अनेक गुन्हे दखल असल्याने आरोपीला तडीपार करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यात पत्नीने पुरावा नष्ट करण्यासाठी मदत केल्याने आरोपीच्या पत्नीला देखील अटक करण्यात ली आहे, अशी माहिती कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील वर्षी याच आरोपीने कोळसेवाडी परिसरात या मुलीला गाठून भर रस्त्यात तिचा पाठलाग करत तिला पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या मुलीने प्रतिकार केल्यानंतर त्याने तिला मारहाण देखील केली होती. मात्र यावेळी सुद्धा तिला सोडवण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. आताही भर रस्त्यातून आरोपीने मुलीला उचलून नेताना अनेकांनी पाहिले मात्र कोणीही आरोपीच्या भीतीने पुढे आले नाही किंवा याची माहिती ही या मुलीच्या पालकांना कोणी दिली नाही असा आरोप या मुलीच्या आईने केला आहे.

सदर विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक केल्यानंतरही त्याने पोलिसांबरोबर व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत मुजोरी दाखवून दिली होती. सप्टेंबर महिन्यात न्यायालयाने या आरोपीची जामीनावर सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा या आरोपीने या मुलीचे अपहरण करत तिच्याशी गैरकृत्य करून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या आरोपीचे देखील बदलापूर प्रमाणेच एन्काऊंटर केले जावे, अशी मागणी संतापलेल्या नागरिकांकडून केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here