पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : स्वारगेट एस टी बसस्थानकावर होणार्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील व हातातील दागिने चोरुन नेणार्या दोघा महिलांना जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे.त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून ४ लाख ८८ हजार रुपयांचे ६० ग्रॅमचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
स्वारगेट एस टी बसस्थानकात होणार्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, हातातील बांगड्या चोरुन नेल्याचे गुन्हे वाढत होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढविली होती. स्वारगेट पोलीस ठाण्याकडील दामिनी मार्शल पोलीस अंमलदार अनिता धायतडक या १९ डिसेंबर रोजी दुपारी स्वारगेट एस टी बसस्थानक परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी त्यांना दोन महिला संशयास्पद रित्या तेथे वावरताना दिसून आल्या. त्यांनी पोलीस अंमलदार संदीप घुले व सुजय पवार यांना बोलावून घेतले. ते आल्यावर दुर्गा अविनाश उपाध्याय (वय ३०, रा. म्हाडा कॉम्प्लेक्सजवळ, खडकी, मुळ रा. बापूनगर, गुलबर्गा, कर्नाटक) आणि लक्ष्मी भिवा सकट (वय २५, रा. खडकी, मुळ रा़ सोलापूर) या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी ७ ते ८ महिन्यांपूर्वी त्यांनी आळंदी येथे जाणार्या बसमधील महिलेच्या हातातील बांगडी चोरी केले होती. पोलिसांनी गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता चोरीचा गुन्हा दाखल होता. या महिलांना अटक करुन तपासादरम्यान ४ लाख ८८ हजार रुपयांचे ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, पोलीस हवालदार मोराळे, तनपुरे, घुले, पवार, पोलीस अंमलदार शिंदे, टोणपे, खेंदाड, शेख, चव्हाण, दुधे, काळे महिला पोलीस हवालदार सिताप, शिंदे, महिला पोलीस अंमलदार अनिता धायतडक, सांगोलकर यांनी केली आहे.







