बांगलादेशात ख्रिसमसच्या दिवशीच ख्रिश्‍चनांची १७ घरे पेटवली

बांगलादेशात

ढाक्का (बांगलादेश) – बांगलादेशात अगोदरच अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य केले जात असताना, आता तेथे राहणाऱ्या इतर अल्पसंख्याक गटांवरही हिंसाचार सुरू झाला आहे. यावेळी इस्लामिक कट्टरतावाद्यांनी ख्रिसमसच्या दिवशी ख्रिश्चनांची सुमारे १७ घरे पेटवून दिली. ही घटना बंडरबन जिल्ह्यातील लामा भागात घडली.

 

२५ डिसेंबर रोजी सकाळी गावकरी ख्रिसमसच्या प्रार्थनेसाठी शेजारच्या गावात गेले होते तेव्हा हा हल्ला झाला. हा हल्ला ख्रिश्चन समुदायावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, टोंगजिरी भागातील न्यू बेताचारा पारा गावातील लोक चर्च नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी सण साजरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्याच्या पाठीमागून गुन्हेगारांनी गावावर हल्ला केला आणि १७ घरे पूर्णपणे जाळली. या हल्ल्यात १५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

 

न्यू बेताचारा पारा गावातील लोकांनी ढाका ट्रिब्यूनला सांगितले की, गेल्या महिन्यात १७ नोव्हेंबरला बदमाशांनी त्यांना गाव रिकामे करण्याची धमकी दिली होती. यावर गंगा मणि त्रिपुरा नावाच्या व्यक्तीने लामा पोलीस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता घर जळून खाक झाल्यानंतर पीडित कुटुंबाला मोकळ्या आकाशाखाली जगावे लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here