चेन्नई (वृत्तसंस्था) – तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधील अण्णा विद्यापीठात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिलेय. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी विद्यापीठाच्या बाहेर बिर्यानी विकणाऱ्या हातगाडीवाल्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईमधील अण्णा विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये सोमवारी रात्री आठच्या सुमारास इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. त्याआधी दोन जणांनी तिच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. ती विद्यार्थीनी मित्रासोबत कॅम्पसमधील एका ठिकाणी गप्पा मारत बसलेली होती. त्यावेळी दोन जणांनी विद्यार्थीनिच्या मित्रांवर हल्ला केला. त्यानंतर तिला झुडपात ओढलं अन् लैगिंक अत्याचार केले. पीडितेने कोट्टूरपुरम महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोकांचा रोष पाहता तपासासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत.पोलिसांनी याप्रकरणी ३७ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तो विद्यापीठाच्या बाहेर हातगाड्यावर बिर्यानी विकतो, असं तपासात समोर आलेय.
अण्णा विद्यापीठात विद्यार्थिनीवरील बलात्काराच्या या घटनेनंतर संपूर्ण चेन्नई हादरली आहे. याबाबत विद्यार्थिनीनेच पोलिसांत तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला. सुरुवातीला पोलिसांनी हे प्रकरण हलके घेत कोणतीही कारवाई केली नाही. सोशल मीडियावर हे प्रकरणाची चर्चा सुरू झाली, विद्यापीठात आंदोलन करण्यात येऊ लागले. विद्यार्थ्यांचा आणि लोकांचा रोष पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, अन् कारवाई केली.







