गुरुग्राम (वृत्तसंस्था) – लोकप्रिय आरजे सिमरन तिच्या राहत्या घरी फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली आहे. पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याची प्राथमिक माहिती दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. सिमरनचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सोपावण्यात आला आहे. मूळची जम्मूमधील असलेली सिमरन गुरुग्राममध्ये राहत होती.
आरजे सिमरन (वय २५) गुरुग्राममध्ये सेक्टर ४७ मध्ये राहत्या घरात मृतदेह आढळल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सिमरन रेडिओ जॉकी होती. सिमरन रेडिओ मिर्चीमध्ये आरजे होती. २०२१ पर्यंत तिथे काम केल्यानंतर तिने नोकरी सोडली होती. सध्या ती फ्रिलान्सिंग करत होती. त्याशिवाय सोशल मीडियावर विविध व्हिडिओ ती पोस्ट करत होती. सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर ती अतिशय लोकप्रिय होती. ६ लाखहून अधिक लोक तिला फॉलो करत होते. तिच्या अशा अचानक जाण्याने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून तिच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.
आरजे सिमरन रेडिओ विश्वातील अतिशय लोकप्रिय नाव होतं. तिच्या आवाजाचे अनेक चाहते होते. तिने रेडिओद्वारे, आपल्या आवाजातून अनेकांच्या मनात आपली खास ओळख, खास जागा निर्माण केली होती. ती सोशल मीडियावरही अतिशय लोकप्रिय होती. ती रेडिओच्या माध्यमातून लोकांशी खूप बोलायची आणि आयुष्याशी, आयुष्य जगण्यासंबंधित खास विचारही शेअर करायची. गुरुग्राममध्ये सेक्टर ४७ मध्ये राहत्या घरात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.







