दोन लाखांची लाच घेतांना अकलूज नगरपरिषदचा स्वच्छता निरीक्षक रंगेहाथ

अकलूज नगरपरिषद

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी राहुल मस्के) : नगरपरिषद, अकलूज येथे स्वच्छता निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या नितीन सिद्राम पेटकर (वय ४०, रा. अक्कलकोट) याच्यावर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याबद्दल सापळा रचून कारवाई केली आहे.

 

याबाबत लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांची श्री गणेश इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस, बारामती नावाची कंपनी असून, ही कंपनी विविध नगरपरिषद, नगरपालिकांना साफसफाई व इतर कामांकरिता मनुष्यबळ पुरवठा करत असते.

 

ही कंपनी विविध आस्थापनांशी समन्वय साधून टेंडर भरणे, मनुष्यबळ पुरवणे, पत्रव्यवहार करणे, वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे आदी शासकीय कामे करते. अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा, वाणिज्य गाळे, शौचालये साफसफाई करण्यासाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याकरिता प्रसिद्ध केलेले टेंडर श्री गणेश इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस, बारामती यांना मंजूर झाले. या कंपनीने अकलूज नगर परिषदेस मनुष्यबळ पुरवठा केला होता.

 

त्यानंतर निविदा दर मंजूर करून वर्कऑर्डर देताना स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर याने तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या ३ टक्के रक्कम व वर्कऑर्डर मंजुरीसाठी सुमारे एक लाख ९५ हजार रुपये लाचेची मागणी केली. यावरून स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर याच्या विरुद्ध अकलूज पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलिस अंमलदार कोळी, पोलिस नाईक संतोष नरोटे, हवालदार राहुल गायकवाड या लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here