जळगाव – जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागातील लेखाधिकाऱ्याला नाशिकच्या एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ अटक केली. येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत आज (दि.१६) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सिंचन विभागातील लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याला १३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
लेखाधिकारी सुरेंद्रकुमार आहिरे याने ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली होती परंतु ठेकेदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे पथकाने सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या आवारात सापळा रचला होता. आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून तडजोडीअंती १३ हजाराची लाच घेताना या पथकाने रंगेहाथ अटक केली. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिक विभागाचे लाचलुचपत पोलीस अधीक्षक सुनिल कळासने, पो.नि. चंद्रकांत फालक, पो.ना. सपकाळे, प्रविण महाजन, पी.एच. पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.






