सुशांतच्या आत्महत्येने कॅप्टन कुल धोनी दुःखी

रांची – ‘कॅप्टन कूल’ धोनीच्या आयुष्यावरील ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात धोनीची व्यक्तीरेखा सुशांतने साकारली होती. या चित्रपटातून सुशांतला अधिक लोकप्रियता मिळाली होती. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची व्यक्तीरेखा सुशांत सिंह राजपूतने मोठ्या पडद्यावर साकारली होती. सुशांत सिंह राजपूतने रविवार दि. १३ रोजी मुंबईतील बांद्रा येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर अनेक सेलिब्रिटी, दिग्गज मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला श्रध्दांजली वाहिली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाचे वृत्त ऐकून महेंद्र सिंह धोनी चिंतेत आहे. सुशांतने आत्महत्या केली आहे, यावर धोनीला अजूनही विश्वास बसत नसून तो दु:खी असल्याचे धोनीचे मॅनेजर अरुण पांडे यांनी म्हटले आहे. एका खासगी चॅनेलशी बोलताना पांडे म्हणाले, ‘धोनी खूप निराश आहे. आम्ही विश्‍वासदेखील करू शकत नाही की, ही घटना घडली आहे. मी माझे दु:ख सांगण्याच्या मन:स्थितीत नाही. धोनी देखील खूप दु:खी आहे. ही खूपच दु:खद घटना आहे.’
धोनीकडून प्रत्यक्षात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, अरुण पांडेंकडून माही निराश आणि दु:खी असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. एक यशस्वी करिअर त्याची प्रतीक्षा करत होते. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येतात.’
अरुण पांडे म्हणाले, ‘सुशांत माजी क्रिकेटर किरण मोरेंच्या मार्गदर्शाखाली सराव करायचा. मोरे सुशांतला सामना कसा खेळायचा याचे प्रशिक्षण द्यायचे. चित्रपटात धोनीची भूमिका साकारण्याठी हे खूप गरजेचे होते. मला आठवते की, सुशांतला सरावादरम्यान पाठीला दुखापत असतानाही त्याने खूप कष्ट घेतले. एका आठवड्याच्या आत तो बरा झाला. त्यावेळी सुशांतला पाहून माहीलादेखील चांगले वाटले होते.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here