पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : नववर्षाचे आगमन आणि सरत्या वर्षाला निरोप देत असतांना, पार्टीत ऑफर केलेली दारू पिण्यास नकार देणार्या तरुणावर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी वर्कशॉप मालक नवप्रित अजितसिंग संधु (वय २९, रा. इंद्रायणीनगर पोलीस लाईन, भोसरी) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अनुज फेबीयन के अे (वय २८, रा. अॅन्टलॉन सिटी, दापोडी) हा तरुण जखमी झाला असून, ही घटना भोसरीतील गुळवे वस्तीतील नवप्रितसिंग संधु याच्या वर्कशॉपमध्ये १ जानेवारीला पहाटे १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली.
फिर्यादी हे शिक्षण घेत असून, पार्टीसाठी ते नवप्रितसिंग संधु याच्या वर्कशॉपवर आले होते. तेथे संधु याने अनुजला दारु पिण्याची ऑफर केली. त्याने नकार दिला. दारुच्या नशेत असलेल्या संधुला त्याचा राग आला. त्याने वर्कशॉपमधील तलवारीने अनुज याच्या कपाळावर व मानेवर जोरात वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन संधु याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दशवंत तपास करीत आहेत.







