ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देशभरात मोठी तयारी केली जाते. लहान-थोर सर्वच जण न्यू ईयरच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतात. डान्स, गाणी, खेळ, जेवणाची मेजवानी अशा अनेक गोष्टींद्वारे ३१ डिसेंबर अर्थात वर्षाची सांगता आणि नव वर्षाचं स्वागत केलं जातं. मात्र हेच सेलिब्रेशन एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मिरा-भाईंदरमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री दोन तरुणांना झालेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
डीजेवर गाणे लावण्यावरुन झालेल्या वादातून काशिमिरा भागातील दोन तरुणांना मंगळवारी म्हणजेच ३१ डिसेंबरच्या रात्री बेदम मारहाण करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान एका २४ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला आहे.
काशिमिरा परिसरातील डेटा गार्डन इमारतीजवळ म्हाडा इमारत आहे. या इमारतीत नववर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने ३१ डिसेंबरच्या रात्री डीजे लावण्यात आला होता. यावेळी इमारतीत राहणाऱ्या राजा परियार आणि विपुल राय यांचा डिजेवर कोणते गाणे लावायचे? यावरून त्याच इमारतीतच राहणाऱ्या काही जणांशी वाद झाला. या वादाचं नंतर हाणामारीत रूपांतर झालं. राजा आणि विपुलला इमारतीतील काही जणांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.
यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान राजाची तब्येत अधिक खालावत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.







