पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी ऐन रंगात आली असताना माझ्याआधी मटण का खाल्ले याचा जाब विचारल्याने दोघा मित्रात मोठा वाद झाला. यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावड्याचा दांडा घातल्याची घटना घडली आहे.
येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव वर्षा निमित्ताने मित्रांची पार्टी सुरु असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या आधी मटण खाल्ल्याने दुसरा मित्र भडकला आणि त्याने त्या मित्राला चांगलीच शिवीगाळ केली. त्यामुळे शब्दाला शब्द वाढत गेला आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावड्याचा दा़ंडा मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निगेश म्हेत्रे आणि सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र असून खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. इतकंच नाही तर ते दोघे ही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते पार्टी करत होते. दरम्यान, निगेश तू आमच्या अगोदर मटण का खातोस असा जाब सोनवणे याने विचारला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणे याने निगेश म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावडयाचे दांडक्याने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात निगेशच्या डोक्याला जबर मार लागला. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसपुढील तपास करीत आहे.







