पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे गणेश वाघू तांडे (१७) या अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समजते आहे.
या प्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश तांडे याचे कुटूंब व पेटकर कुटूंब एकाच भागात राहण्यास आहेत. गणेश हा पेटकर यांच्या मुलीशी बोलत असल्याचा संशय कुटूंबियांना होता. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, मंगळवारी रात्री साडे बाराच्या सुमारास गणेश नेहमीप्रमाणे मित्रासोबत वस्तीत थांबलेला होता. तेव्हा वडिल तसेच त्यांची दोन मुले येथे आली. त्यांनी गणेशला गाठले. तिघांनी गणेशवर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला केला. हा हल्ला इतका क्रूर होता की, गणेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याघटनेनंतर परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी येथे धाव घेतली. तसेच, तिघांना ताब्यात घेतले. या खूनामुळे मात्र, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.







