नवविवाहित तरुणाची चाकूने भोसकून हत्या

निर्घृण हत्या
File Photo

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : बुधवार (दि.१) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास महादेव दौलत घुगे (वय-३०, रा. येवती, बुलढाणा) या नवविवाहित तरुणावर चाकूने करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अनिस इदरीस खान (वय-२५) व साहिल राजू वाघरी (वय-२३) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव घुगे हा पालघर शहरातील खानपाडा परिसरातील आपल्या सासुरवाडीकडे काही दिवसांपूर्वी आला होता. त्याच्या पत्नीला आरोग्याशी संबंधित काही समस्या असल्याने तिचे आई- वडील तिला पालघरला घेऊन आले होते. त्यामुळे पत्नीला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी महादेव पालघरला आला होता.

 

दीड महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. बुधवारी रात्री जेवल्यानंतर फेरफटका मारून येतो, असे महादेव याने आपल्या सासू-सासऱ्यांना सांगितले. त्यानुसार तो हुतात्मा स्तंभ परिसरात आला असताना अनिस इदरीस खान (वय-२५) व साहिल राजू वाघरी (वय-२३) या दोन जणांनी त्याला गाठले. त्यावेळी महादेव याच्याशी त्यांची वादावादी झाली. या वादावादीतून या दोघांनी महादेव याच्यावर चाकूने सपासप वर केले व त्याला गंभीर जखमी केले.

त्याच्याकडून मोबाईल व पैशांची मागणी केली असल्याची माहिती पुढे येते. अनिस याने धारदार चाकूने महादेव याच्यावर सपासप वार केले. त्यानंतर महादेव याने तेथून पळ काढत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जखमी अवस्थेत असलेल्या महादेवला उपचारासाठी पालघर व त्यानंतर सेलवास येथील रुग्णालयात नेले. मात्र, गुरुवारी (दि.२) दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे त्याच्या सासऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी या दोन्ही आरोपीपैकी एकाला रात्री घटनास्थळावरून अटक केली. तर दुसऱ्याला बोईसर गांधी पाडा परिसरातून पहाटे अटक केली. दोघेही आरोपी पालघर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सतीश धाराशिवकर व पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here