महाराष्ट्र राज्य २१ व्या बाल राज्य नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन संपन्न

बाल राज्य नाट्य

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित २१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४ – २०२५ चे जळगाव केंद्रावर उद्‌घाटन संपन्न झाले. छत्रपती संभाजी महाराज नाटयगृह येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण २१ बालनाट्य सादर होणार आहेत. स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना.आशिष शेलार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत जळगाव केंद्रावरील स्पर्धेतील बालकलावंतांना शुभेच्छा दिल्यात.

 

उद्‌घाटन सोहळ्याला रंगमंचावर बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, ज्येष्ठ रंगकर्मी पियुष रावळ यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक राजीव वेंगुर्लेकर (मुंबई), गौरी लोंढे (पिंपरी चिंचवड), शेखर भागवत (पुणे), स्पर्धेचे जळगाव समन्वयक प्रा.संदीप तायडे आदींची उपस्थिती होती.

 

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नटराजपूजन झाल्यानंतर नाट्यपरंपरेनुसार योगेश शुक्ल यांनी घंटा वाजवून स्पर्धेचे औपचारिक उद्‌घाटन झाल्याचे जाहीर केले. यावेळी बोलतांना, त्यांनी जळगावातील बालनाट्य व बालरंगभूमी परिषदेचे कार्य याविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच शहरातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा पाहण्यासाठी पाठवून संयोजकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी बालरंगभूमी परिषदेचे बालनाट्य व बालरंगभूमीवरील इतर उपक्रमांची माहिती देत. बालरंगभूमी परिषद करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा याप्रसंगी मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद देसाई यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here