किरकोळ कारणावरून सांगलीत पोलीस स्टेशन समोरच फ्री स्टाईल हाणामारी

फ्री स्टाईल हाणामारी

सांगली (प्रतिनिधी) : येथील सत्यविजय चौकात किरकोळ कारणातून डोक्यात फरशी मारल्याच्या घटनेनंतर दोन्ही गट समोरासमोर आल्यामुळे वाद उफाळून आल्याचा प्रकार घडला आहे. शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दुपारी हाणामारी झाली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. हाणामारीचा व्हिडीओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आहे. सांगली शहर पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

संशयित शोएब रफीक गोलंदाज, जैद अब्दुल मुनाफ, सद्दाम सलीम मोमीन (रा. खणभाग, सांगली) व आयान नौशाद सुतार, नौशाद नबीलाल सुतार, इक्बाल सिकंदर तांबोळी, रफिक रसून शेख (चौघे रा. सावळवाडी, ता. मिरज) या दोन्ही गटातील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

 

संशयित शोएब गोलंदाज याचा भाऊ हुजेफ गोलंदाज व त्याचा मित्र कलिम खान हे दिनांक १० रोजी सत्यविजय चौकात थांबले होते. त्यावेळी सावळवाडी येथील युसूफ शेख तेथे आला. हुजेफ याने त्याच्याकडे पाहिल्यानंतर, माझ्याकडे का पाहतोस म्हणून युसूफने बाजूला पडलेली फरशी उचलून हुजेफच्या डोक्यात मारली. याबाबत हुजेफने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

या गुन्ह्याच्या चौकशीच्या निमित्ताने दोन्ही गटांचे लोक पोलिस ठाणे परिसरात आले होते. तेव्हा तीन दिवसांपूर्वीच्या वादातून दोघे जण एकमेकाला भिडले. त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. तेव्हा इतरांनी तत्काळ धाव घेत त्यांना आवरले. परंतु यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटातील तरुणांना शांत केले. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील सात जणांविरूद्ध मारामारी, झोंबाझोंबी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here