बालविवाह करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

fir
file photo

अमरावती (प्रतिनिधी) : एका १६ वर्षीय मुलीसोबत १९ वर्षीय तरूणाने विवाह केला. विवाहातून त्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाले. परिणामी ती गर्भवती राहून तिने मुलाला जन्म दिला. ही घटना बुधवारी (दि.१४) शिरखेड ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक (वय १९) नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

पीडित १६ वर्षीय मुलगी ही आई-वडिलांसोबत गवंडी कामासाठी एका गावात आली होती. त्यावेळी तिची दीपकसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, ती आपल्या गावी परतल्यानंतरही त्यांच्यात मोबाईलवरून बोलचाल सुरू होती. सप्टेंबर २०२३ मध्ये दीपकने तिला मोबाईलवर कॉल करून मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हटले. त्यामुळे ती आपल्या आई-वडिलांना काहीही न सांगता घरून निघून गेली. त्यावेळी आरोपीने तिच्यासोबत एका मंदिरात लग्न केले.

 

त्यानंतर ते पती-पत्नीसारखे राहू लागले. या काळात त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. शुक्रवारी (दि.१०) तिची प्रकृती बिघडल्याने तिला अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रसूती होऊन तिला मुलगा झाला. दरम्यान, ती अल्पवयीन असल्याने रुग्णालय प्रशासनाने याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी रुग्णालय गाठून तिची साक्ष नोंदविली. तिच्या साक्षीवरून बलात्काराच्या गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळ हे शिरखेड ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हा गुन्हा तेथे वर्ग करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here