नाशिक (उपसंपादक चांगदेव पु. पवार) : नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याने जिल्ह्यात तीन दिवसांत सहा जणांचे गळे चिरले गेले, तर नाशिकच्या पाथर्डी-वडनेर रस्त्यावर मंगळवारी सकाळी सोनू धोत्रे या तरुणाचा बळी गेला. तो गुजरातहून दुचाकीवरून येत असताना घरापासून काही अंतरावरच मांजाने घात केला. याप्रकरणी पोलीस अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.
देवळाली कॅम्पजवळील शिंगवे बहुला चारणवाडी येथील सोनू किसन धोत्रे (वय २३) हा मंगळवारी गुजरातहून संक्रांतीनिमित्त दुचाकीवरून नाशिकला आला. सकाळच्या सुमारास पाथर्डी फाटा येथून वडनेर रस्त्याकडे जात असताना नायलॉन मांजामुळे गळा पूर्ण चिरला जाऊन तो जमिनीवर कोसळला. उपचारापूर्वीच त्याचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. त्याचे मामा, मावशी, इतर नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा रुग्णालयात गर्दी केली.
देवळाली कॅम्प भागातील चारणवाडी येथील सोनू धोत्रे हा गुजरातच्या वलसाड येथील महापालिकेत नोकरी करीत होता. मे महिन्यात त्याचे लग्न होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. संक्रांतीनिमित्त तो आजारी आई, भावासह मित्र परिवाराला भेटण्यासाठी गुजरातहून दुचाकीवरून येत असताना नायलॉन मांजाच्या रूपात काळाने गाठले आणि आई, भावाशी भेट घडलीच नाही.
येवला शहर व तालुक्यात पतंगोत्सवाची मोठी धूम असते. येथे दोन दिवसांत चौघेजण मांजामुळे जखमी झाले आहेत. कोटमगाव येथे पाच वर्षीय देवराज दीपक कोटमे याच्या गळय़ाला १३ टाके पडले. पिंपळखुटे येथे शुभम सजन पवार, तर अंदरसूल येथे दीपक राऊत जखमी झाले आहेत. १२ तारखेला हुडको कॉलनीत ३० वर्षीय सुमित भालेराव याची मांजामुळे पापणी कापली, तर पारेगाव येथून दुचाकीवरून येवल्याकडे येणाऱ्या ३० वर्षीय दत्तात्रेय जेजूरकर जखमी झाले.
निफाड तालुक्यातील विंचूर येथील पार्वती स्टील दुकानाजवळ सोमवारी सायंकाळी १६ वर्षीय रेहान शेख याचा गळा मांजाने चिरला. गळय़ाला गंभीर दुखापत होऊन डाव्या बाजूने तब्बल ४१ टाके पडले आहेत. त्याच्यावर लासलगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत आहे. या विव्रेत्या व वापरकर्त्यांवर कठोर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
शहर व ग्रामीण पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री रोखण्यासाठी पावले उचलली. मात्र, छोटय़ा विक्रेत्यावर थातूरमातूर कारवाई केली. पोलिसांचा विक्रेत्यांना धाकच नसल्याने मांजा बाजारात आलाच आणि त्याने जीवितास धोका निर्माण करीत पंधरा दिवसांत जिह्यात ३० जणांना जखमी केले. यात येवल्यात १४, सिन्नरला १०, मालेगावला १, लासलगावला २ अशी ही संख्या आहे. नाशिक शहरात तीन जखमी झाले, तर एकाचा या मांजाने बळी घेतला.







