बीड (प्रतिनिधी) : बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा विषय संपूर्ण राज्यात चर्चिला जात असतांना, शुक्रवारी बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. विकास कामासाठी आलेल्या चार लाख रुपयांच्या निधीपैकी एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास करण्यात येतोय.
संतोष देशमुख खून प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावच्या महिला सरपंचाला एक लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. ममदापूर-पाटोदा गावातील तिघांनी महिला सरपंचाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.
अंबाजोगाईमधील ममदापूर पाटोदा गावात शाळा दुरुस्तीच्या कामासाठी चार लाख रूपये आले आहेत. गावातील शाळेचं काम सुरू करण्यात आलेय. पण त्याचवेळी गावातील वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख यांनी वारंवार अडथळा निर्माण केला. त्याशिवाय चार लाखांपैकी एक लाख रूपयांची सरपंच मंगल राम मामडगे यांच्याकडे मागणी केली. या प्रकरणी सरपंच मामडगे यांनी फिर्याद दिल्यानंतर माजी सरपंच, एक सदस्य व उपसरपंचाचे पती या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममदापूर पाटोदा या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच या महिला आहेत.
याप्रकरणी महिला सरपंचाच्या फिर्यादीवरून आता अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत..







