एरंडोलमध्ये आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

आदर्श बाप गौरव

एरंडोल (उपसंपादक गजानन पाटील) : बाप ही सुसंस्कृत पिढी घडवणारी आदर्श व्यक्ती असून कुटुंबाला प्रगतीपथावर नेणाऱ्या अशा बापांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सदानंद भावसार यांनी केले. ऊर्जा सामाजिक संस्थेतर्फे आयोजित आदर्श बाप गौरव पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

 

यावेळी आयुष्यभर सालदारकी करत तर कधी पडेल ते काम करत कुटुंबाला पुढे नेणाऱ्या व मुलाला उद्योजक घडवणाऱ्या खंडू महादू महाजन यांना नुकतेच धुळ्याचे निवृत्त आदर्श शिक्षक स.ध. भावसार यांच्या हस्ते आदर्श बाप गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गजानन तात्या पाटील ,निवृत्त तहसीलदार अरुण भाऊ माळी, प्रा. एन ए पाटील, निवृत्त शिक्षक पंडित सोनवणे, राजेश साळी, चंद्रकांत महाजन, बाळासाहेब पाटील, एरंडोल शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र लाळगे, ऊर्जा संस्थेच्या अध्यक्षा अंजली महाजन, पत्रकार प्रवीण महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

ऊर्जा संस्थेने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. श्री खंडू महाजन या आदर्श बापमाणसाची आजपर्यंत कोणीही दखल घेतलेली नव्हती. त्यामुळे ऊर्जा संस्थेने त्यांची योग्य निवड केल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी त्यांचे सुपुत्र तथा उद्योजक नाना खंडू महाजन हेही यावेळी उपस्थित होते.

२२ वडिलांचा विशेष सन्मान..
कार्यक्रमात कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या २२ वडिलांना आदर्श बाप गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये निवृत्त पोलीस निरीक्षक, शिक्षक, शेतकरी व इतर विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या आदर्श वडिलांचा समावेश होता.

यावेळी बोलतांना अध्यक्ष सदानंद भावसार यांनी सांगितले की, मुलांनी त्यांच्या पालकांच्या कष्टांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यांना प्रेम व आदर दिला पाहिजे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात पालकांविषयी कृतज्ञतेची भावना वाढीस लागते. उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बाप महोत्सव हा समाजाला प्रेरणा देणारा उपक्रम असून मुलांनी त्यांच्या वडिलांचे जीवन अधिक सुखकर कसे करता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले, तर आभारप्रदर्शन निंबा बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऊर्जा संस्थेचे अध्यक्ष अंजली महाजन, सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव विनायक कुलकर्णी, दिनेश चव्हाण, संदीप पाटील, ममता सुतार, गणेश महाजन, रविंद्र महाजन, दीपक शेंडे, कल्याणी महाजन, तेजस्विनी महाजन आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. हा पुरस्कार सोहळा कुटुंब व्यवस्थेतील वडिलांच्या महत्त्वाला व आदर्श वडिलांची भूमिका समाजापुढे उभी करत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here