सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : वीज बिल कमी येत असल्यामुळे महावितरणकडून मीटर तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत काही ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करत वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. यामुळे गावातील ७७ वीज ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी महावितरणने ताब्यात घेतले आहेत. यात काही निष्पन्न झाल्यास पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली जात आहे. शहरात तपासणी करण्यासोबतच आता ग्रामीण भागातदेखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे वीजचोरी करणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहे. गुरुवारी व शुक्रवारी महावितरणचे जळगाव, चाळीसगाव, धुळे, नाशिक, भडगाव, पाचोरा येथील अधिकाऱ्यांचे पथक रावेर तालुक्यातील सावदा या गावात आले होते. यामध्ये माजी नगरसेवक यांच्या घराचे विद्युत मीटर चेक करण्यात आले आणि माजी नगरसेवक वीज चोरीच्या संशयाच्या भोवऱ्यात आढळून आले आहेत.
राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात येत आहे. लवकरच इतर गावांमध्येदेखील कर्मचाऱ्यांच्या वतीने डिजिटल मीटर बसवून जुने मीटर काढण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. वीजचोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सावद्यातील ७७ घरांमधील मीटर हे तपासणी कामी काढण्यात आले आहेत. मीटरमध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे.
महावितरणने ताब्यात घेतलेल्या मीटरची वरिष्ठ पातळीवर तपासणी केली जाणार आहे. आता नागरिकांच्या घरात पूर्वीच्या जुन्या मीटरऐवजी नवीन स्मार्ट डिजिटल मीटर लावले जाणार आहेत.
अशा संशयित मीटरमधील तफावत व संबंधितांनी चोरी केलेली असल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे. यात काही आढळून आल्यास वीज युनिटनुसार त्यांना दंडाची नोटीस दिली जाणार असल्याचे विद्युत वितरण कंपनीकडून सांगण्यात आले आहे.







