हमास आणि इस्रायलमध्ये शनिवारपासून युद्धबंदी जाहीर

युद्धबंदी

कैरो (वृत्तसंस्था) : इस्रायल आणि हमास दहशतवादी यांच्यातील युद्धबंदी आज (रविवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून लागू होईल, असे कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले. त्यामुळे हमास आणि इस्रायल यांच्यात गाझा पट्टीत सुमारे १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर शेकडो रॉकेट डागली होती.. तेव्हा १ हजार २०० इस्रायली नागरिक ठार झाले होते. सुमारे २५० नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. नंतर ओलिसांची सुटका केल्यानंतर सुमारे १०० ओलिस दहशतवाद्यांच्या तावडीत आहेत. त्यांची सुटका करण्याची मागणी करुन इस्रायलने गाझा पट्टीत मोठे हल्ले केले. त्यात ४६ हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. त्यात महिला आणि मुलांची संख्या अर्ध्याहून अधिक आहे. लाखो नागरिक गाझा पट्टी सोडून इजिप्तच्या राफा सीमा परिसरात निर्वासितांचे जीवन जगत आहेत.

कतारचे परराष्ट्र मंत्री आजिम अल अन्सारी यांनी याबाबतची एक्सवर पोस्ट केली. नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अधिकारी सांगतील त्या प्रमाणेे वर्तन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शनिवारी सकाळी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझात युद्धबंदी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या १५ महिन्यांपासून हमासच्या तावडीतील इस्रायली ओलिसांच्या सुटकेचा मार्गही मोकळा होत आहे. करारा अंतर्गत प्रथम ३३ ओलिसांची सुटका पुढील सहा आठवड्यांत होणार आहे. त्या बदल्यात इस्रायलच्या तुरुंगातील शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाणार आहे. ओलिसांच्या सुटकेनंतर दुसर्‍या टप्प्यात पुरूष सैनिकांची सुटका होणार आहे. दरम्यान, हमासने स्पष्ट केले की, इस्रायलने युद्धबंदी लागू करण्याची आणि इस्रायलचे सैनिक मागे घेतल्यानंतर उर्वरित ओलिसांची सुटका करणार आहोत. पण, प्रश्न असा आहे की, ज्या ३३ ओलिसांची नावे सुटकेसाठी जाहीर केली आहेत. त्यापैकी किती जिवंत आहेत.

पहिल्या दिवशी ३ महिला ओलिसांची, सातव्या दिवशी चार ओलिसांची आणि उर्वरित २९ जणांची सुटका पुढील पाच आठवड्यांत करण्यावर हमास राजी झाला आहे. इस्रायलच्या तुरुंगात ७०० पॅलेस्टिनी कैदी आहेत. त्यांची यादी न्याय विभागाने जाहीर केली आहे. त्याची सुटका करारानुसार पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. यादीतील सर्वजण तरुण आणि महिला आहेत. त्यांची सुटका आज (रविवारी) सायंकाळी ४ पूर्वी केली जाणार नाही.दरम्यान, हल्ल्यात गाझाची प्रचंड नासधूस झाली आहे. इजिप्त सीमेवरील रफा सीमेवर गाझात प्रवेश करण्यासाठी मानवी मदतीच्या मालमोटारी शुक्रवारपासून रांगेत उभ्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here