चितळी ग्रामपंचायतीत दारूबंदी व अवैध धंदे बंदीचा ठराव संमत

दारूबंदी

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चितळी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदी व जुगार, पत्ते क्लब आदी अवैध धंदे बंदीचा ठराव लागू करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने १५ जानेवारी २०२५ ला मंजूर केला. ग्रामपंचायतीचे सामाजिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी तत्काळ दारूबंदी करण्याचे निवेदन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

 

चितळी ग्रामपंचायत क्षेत्रात दारू विक्रीच्या दुकानांत वाढ होत आहे. येथील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक घरांतील वातावरण बिघडत चालले आहे. महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने गावातील दारूची दुकाने बंद करण्याची मागणी महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी केली आहे. ठिकठिकाणी असलेल्या वाईन शॉपमधून दारू विकत घेऊन मद्यपी रस्त्यावरच दारू पित असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. मद्यपींमुळे भांडणे, हाणामारी यासारखे प्रकार दररोज घडत आहेत.

 

गावातील शाळकरी मुलांवर मद्यविक्रीचा, मद्यपींच्या गैरवर्तनाचा दुष्परिणाम होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. दि.१५ जानेवारीला पार पडलेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. या सभेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये तातडीने दारूबंदी लागू करण्याची कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. या ठरावाला सूचक बाबासाहेब राधाकिसन आमटे हे होते तर अनुमोदक आजिनाथ जबाजी आमटे होते. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here