सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंगला गेलल्या महिला प्रांताधिकारी यांच्या शासकीय वाहनाला आपले वाहन आडवे लावून महिला प्रांताधिकाऱ्यांच्या अंगावर जात शिवीगाळ व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना दि. २३ रोजी पहाटे १२.३० ते १.४५ वा सुमारास रोडवरील वरवडे टोल नाक्यानजीक घडली. याबाबत ग्राम महसूल अधिकारी ( कुर्डुवाडी) प्रवीण किसन बोटे यांच्या फिर्यादीवरुन टेंभुर्णी पोलिसांत अण्णा पाटील शिराळ टें ता.माढा, अप्पा पराडे बाबुळगाव ता.माळशिरस, गणेश सोमनाथ काशीद परितेवाडी ता.माढा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबरोबरच प्रांताधिकारी यांच्या पथकाकडून वाळू वाहतूक करताना पकडलेला बिगर नंबरचा टिपर व ४ब्रास वाळू असा एकूण २ लाख २८ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास माढा विभागाच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर व त्यांच्या कार्यालयातील नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, मंडल अधिकारी विशाल गायकवाड,सूर्यकांत डिकोळे फिर्यादी ग्राम महसूल अधिकारी प्रवीण बोटे, महसूल सेवक नवनाथ शिंदे, चालक अतुल दहिटणकर असे सर्व पथक अवैध वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्याकरता जात होते.
दि.२३ रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी -भोसरे- घाटणे-लऊळ- उजनी मा- वरवडे – यामार्गे टेंभुर्णीकडे जात असताना पुणे – सोलापुर रस्त्याच्या लाईनवरून एक वाळूचा टिपर सोलापुरच्या दिशेने जात असताना दिसला. यावेळी प्रांताधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे यु टर्न घेऊन वाळूच्या टिपरचा पाठलाग करुन वरवडे टोल नाक्याजवळ टिपर थांबवण्यात आला. यावेळी टिपर चालक पळून जात असताना त्याला पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत पकडले असता त्याने त्याचे नाव गणेश सोमनाथ काशीद असे सांगितले. प्रांताच्या पथकाने टिपरची पाहणी केली असता एकूण ४ ब्रास वाळू आढळून आली. दरम्यान टिपर चालक कोणाला तरी फोन लावून आपला टिपर पकडला आहे असे सांगत होता.






