पोलिसांनीच केली तरुणाला बेदम मारहाण; खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी

crime
File Photo

चांदूरबाजार (प्रतिनिधी) : बहिरम यात्रेत मित्रांसोबत शंकरपट पाहण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केली, असा आरोप जखमी तरुणाने तक्रारीतून केला आहे. ही लेखी तक्रार ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) घडली.

 

चांदूरबाजार तालुक्यातील वणी बेलखेल येथील संजय ठाकरे (वय 32) हा तरुण आपल्या मित्रासह बहिरम यात्रेत शंकरपट पाहण्यासाठी गेला असता याचवेळी मंचाजवळ उपस्थित मद्यधुंद चार पोलिसांनी संजयला हटकले. याचवेळी चारपैकी एका पोलिसाने संजयच्या पायावर दोन दंडुके मारले. यावेळी तरुणाने हटकले असता संबंधित चार पोलिसांनी बेदम मारहाण केली.

 

तसेच खिशातील सहा हजार रुपये सुध्दा काढून घेतले. तेव्हा यातील पोलिस हे, यात्रेकरूंचे रक्षक की भक्षक? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ग्रामीण पोलस अधीक्षक कोणती कारवाई करतात. याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.पोलिसांकडून आपल्याला झालेल्या विनाकारण मारहाणीची तक्रार देण्यासाठी संजय ठाकरे यांनी यात्रेतील पोलिस चौकी गाठली. येथे तरी आपल्या न्याय मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, चौकीतील पोलिसांनी सुध्दा त्यांना घरी जा, अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू, पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला, असा गुन्हा दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here