अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे शानदार उद्घाटन; नाट्यदिंडी ठरली विशेष आकर्षण

अखिल भारतीय मराठी नाट्य

अहिल्यानगर (संपादक सुनिल पाटील) : राज्याचे उद्योगमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या हस्ते अहिल्यानगर येथील १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनाचे स्व.सदाशिव अमरापूरकर नाट्यनगरी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले.

 

महाराष्ट्राची लोककला सर्वदूर पोहोचविण्यासाठी राज्यातील गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा लोककलांचा माध्यमातून सादर करण्याबाबत लवकरच प्रयत्न करण्यात येईल, असे श्री.सामंत यावेळी म्हणाले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अहिल्यानगर उपनगर शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार संग्राम जगताप, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रेमानंद गज्वी, नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.बापूसाहेब कांडेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, शिरीष मोडक, अजित भुरे, दिलीप कोरके, दीपा क्षीरसागर, प्रा.प्रसाद बेडेकर, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, सहकार्यवाह सुनिल ढगे, कार्यकारिणी सदस्य दिलीप दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जळगाव शाखेतर्फे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे कार्यकारिणी सदस्य सुनिल पाटील व नंदूआप्पा पाटील यांचीही उपस्थिती होती.

 

अहिल्यानगर येथील १०० वे विभागीय नाट्यसंमेलन ऐतिहासिक असून नवे कलाकार घडविण्याचे कार्य अहिल्यानगर नाट्य परिषद शाखेने नेहमी केल्याचे नमूद करून श्री. सामंत म्हणाले, हौशी आणि प्रायोगिक रंगभूमी पासून व्यावसायिक रंगभूमीकडे जाणारे कलाकार घडविण्याची गरज आहे. राज्यात लोककला, संगीत क्षेत्राच्या विकासात ज्येष्ठ कलाकारांचे मोठे योगदान आहे. शहरात नाट्यगृहाची सुविधा करतांना व्यावसायिक नाटकांवर होणारा खर्च कमी करणे गरजेचे आहे.त्यासाठी नाट्यगृहांमध्ये सौर ऊर्जेचा वापर होणे गरजेचे आहे. स्थानिक हौशी रंगभूमी कलाकारांना कमी दराने नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. मराठी भाषेच्या विकासासाठी चांगल्या सूचना आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

अहिल्यानगर परिसरात ३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प उभे राहणार असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. दावोस येथेदेखील जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती, श्री.सामंत यांनी दिली. आमदार जगताप म्हणाले, जिल्ह्यात २२ वर्षापूर्वी नाट्यसंमेलन झाले होते. या माध्यमातून नवीन कलाकार घडविण्याचे कार्य होते. यावर्षी विभागीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करतांना १०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहिल्यानगर शहराला मिळाल्यास त्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येईल.शहरात नाट्यगृह उभे रहात आहे. शहराचा औद्योगिक विकासाची वेगाने होत आहे, असे त्यांनी सांगितले. नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून पुढील पिढीतील कलाकार घडविण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी विभागीय नाट्यसंमेलन सुनियोजित असल्याचे नमूद करून अहिल्यानगर उपनगर शाखेचे आयोजनाबद्दल अभिनंदन केले. अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, नवोन्मेष आणि नवी ऊर्जा असलेल्या रंगकर्मींसाठी ठोस कामगिरी होईल. हौशी रंगमंच सशक्त झाल्यास व्यावसायिक रंगभूमीला बळ मिळते. प्रायोगिक रंगभूमीसाठी गावोगावी मंच उभे राहिल्यास व्यावसायिक रंगभूमी सशक्त होते. राज्य पातळीवर यशस्वी एकांकिका ठिकठिकाणी दाखविण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवर लोककलाकारांच्या माध्यमातून शौर्याची गाथा मांडली गेल्यास नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. रंगकर्मी जेवढे मोठे होतील तेवढा समाजातील एकोपा टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

 

शिक्षणामध्ये जसे चित्रकला आणि संगीत या विषयाचा अंतर्भाव आहे तशाच प्रकारे नाट्याचा सुद्धा समावेश करावा अशी सूचना मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली. अहिल्यानगर येथे आयोजित शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या भाषणात ही सूचना व्यक्त केली तसेच गड किल्ल्यावर लोककलेच्या माध्यमातून त्या गड किल्ल्यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडण्यासाठी प्रोत्साहन द्यावे अशीही सूचना त्यांनी यावेळी मांडली. डॉ. कांडेकर, श्री.भुरे यांनी यावेळी विचार व्यक्त केले.

 

विभागीय नाट्यसंमेलन प्रमुख क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविकात विभागीय नाट्यसंमेलनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी १०० व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्यसंमेलनानिमित्त अहिल्यानगरच्या १०० कलाकारांनी नांदी आणि १०० कलाकारांनी स्वागत नृत्य सादर केले. विभागीय नाट्य संमेलनाची सुरुवात नाट्यदिंडीने करण्यात आली. प्रोफेसर कॉलनी चौकापासून संमेलन स्थळापर्यंत नटराजाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here