बंगळुरु (वृत्तसंस्था) : येथे एका मॉलच्या दुसर्या मजल्यावरून दुकानदार टी. सी. मंजुनाथन (वय ५५) यांनी उडी मारून जीवन संपविले आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
मंजुनाथन हे बंगळुरूच्या उल्लाल उपनगरचे रहिवासी आहेत. मल्लेश्वरमधील मंत्री मॉलच्या दुसर्या मजल्यावरून त्यांनी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उडी मारली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी मृत्यूस कोणाला जबाबदार ठरवू नये, अशी चिठ्ठी लिहिली होती. ती त्यांच्या खिशात पोलिसांना सापडली. पोलिसांनी त्यांच्या आत्महत्येबाबत तपशील दिला.
त्यात म्हटले आहे की, मंजुनाथन अचानक मॉलच्या दुसर्या मजल्यावरील कठड्यावर चढले आणि त्यांनी उडी मारली. जखमी आवस्थेत त्यांना सुरक्षा रक्षकांनी तातडीने रुग्णालयात हलविले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात उघड झाले की, ते कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या मालकीचे इलेक्ट्रिक दुकान होते. ते चालत नव्हते. कर्जाचा वाढलेला भार आणि ते परतफेड करण्यात आलेले अपयश पाहता त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती ज्येष्ठ पोलिस अधिकार्यांनी दिली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.







