वनजमिनीवर गांजाची लागवड, ७६ लाखांचा माल जप्त

ganja
file photo

जळगाव (प्रतिनिधी राजेंद्र महाजन) : शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा गाव शिवारातील वनजमिनीवर गांजाची लागवड करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे. या कारवाईत तब्बल ७६ लाख रुपये किमतीचा ३,८०० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना बोरमळीपाडा गावाच्या वनजमिनीवर गांजाची शेती केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने २८ रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईदरम्यान, संशयित आरोपी संतोष ग्यानसिंग पावरा (वय ४१, रा. बोरमळीपाडा, ता. शिरपूर) आणि रामप्रसाद हुरजी पावरा (वय ४५, रा. भोईटी, ता. शिरपूर) हे दोघेही गांजाच्या शेतीची राखण करताना आढळले. तर, भावसिंग काशीराम पावरा (वय ४५, रा. बोरमळीपाडा, ता. शिरपूर) हा देखील गांजाची शेती करत असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पोलिसांना पाहताच तो पळून गेला. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

 

७६ लाख रुपयांचा गांजा जप्त
पोलिसांनी छापेमारीदरम्यान दोन्ही शेतांतून तब्बल ७६ लाख रुपये किमतीचा ३,८०० किलो वजनाचा सुका व ओला गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर खंडू ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सुनील वसावे करीत आहेत.

शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची शेती
सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या शिरपूर तालुक्यात दुर्गम भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जात आहे. या शेतीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक गठित केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक सुनील वसावे, सागर ठाकूर, पोकॉ. राजू ढिसले, संदीप ठाकरे, पोकॉ. प्रकाश भिल, धनराज गोपाळ, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, चालक अल्ताफ मिर्झा, इसरार फारूकी, मनोज पाटील यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बेकायदेशीररीत्या गांजाची शेती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here