बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे बँकेतून पैसे काढणार्‍या मुलाला कारावास

अटक

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : वडिलांच्या मृत्यूनंतर बनावट स्वाक्षर्‍यांच्या आधारे त्यांच्या विविध बँक खात्यातून दहा लाख रूपये काढणार्‍या मुलाला न्यायालयाने दहा महिने कारावास आणि २९ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हा निकाल दिला.

किसन नागू ओरसे (वय ४६, पीएमसी कॉलनी, जनवाडी) असे शिक्षा सुनावण्यत आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ अनिल नागू ओरसे यांनी न्यायालयात अर्ज केला होता. अनिल ओरसे यांनी वडिलांच्या विविध बँकांकडून माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागविल्यानंतर भावाने रक्कम हडप केल्याचे दिसून आले. या प्रकरणात अनिल याने आरोपी किसन या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी त्याची कुठलीच दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला.

न्यायालयाने किसनविरोधात गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश चतुश्रृंगी पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मालमत्तेचा अपहार, फसवणूक, दस्तावेजांचे बनावटीकरण आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करत आरोपपत्र दाखल केले होते. बनावट स्वाक्षरी करून आरोपीने १ ऑगस्ट २००५ ला वडिलांची मुदत ठेव मोडली. मात्र, आरोपीच्या वडिलांचा १७ जुर्ले २००५ ला मृत्यू झाला होता. सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी या खटल्यात गुन्हा सिध्द करण्यासाठी सात साक्षीदार तपासले. हवालदार रमेश विधाते यांनी न्यायालयीन कामकाजात विशेष मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here