नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चोरी करणारे त्रिकुट भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

crime
file photo

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : प्रवासी झोपल्याची संधी साधून भामट्यांनी नवजीवन एक्स्प्रेसमधील महिला पर्स लांबवली होती. या पर्समध्ये ८० हजारांच्या रोकडसह सहा लाख ३२ हजारांचा ऐवज होता. लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्हीद्वारे संशयीत निश्चित झाले पण ते सापडत नव्हते.

 

हे संशयीत पुन्हा जनता एक्स्प्रेसमध्ये चोरीच्या उद्देशाने भुसावळात येताच भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाईत त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून १८ लाख ६ हजार १८९ रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी रमजान खान हुसेन खान (वय ३५, दुधिया तहसील, नेपानगर), तौसीफ खान चिन्मन खान (वय २२, केरपानी, नेपानगर) व मुस्ताक खान मुस्तफा खान (वय १८, दुधिया तहसील, नेपानगर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून रेल्वेतील आणखी काही गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता आहे.

 

या प्रकरणी समजलेली माहिती अशी की, दिलीपकुमार प्रतापचंद जैन (वय ५७, कापुस्ट्रीट नेल्लोर सिटी, आंध्रप्रदेश) हे पत्नीसह ३० जानेवारी २०२४ रोजी नवजीवन एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगी ए- २ मधून अहमदाबाद ते नेल्लोर असा प्रवास करीत होते. भुसावळ येथून गाडी सुटताच त्यांच्या पत्नीची पर्स लांबवण्यात आली. या पर्समध्ये ८० हजारांची रोकड, दोन नेकलेस सेट, दोन इअरिंग सेट, तीन अंगठ्या, एक हात कंगन, बँगल सेट, मोबाईल मिळून एकूण ६ लाख ३२ हजारांचा ऐवज होता. नेल्लोर येथे त्यांनी तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा तपासार्थ भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग झाला. लोहमार्ग पोलिसांनी घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे तिघे आरोपी गाडीतून उतरताना स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र त्यांचा ठावठिकाणा गवसत नव्हता.

या चोरीच्या सुमारे महिनाभरानंतर ४ फेब्रुवारी रात्री दीड वाजता हे त्रिकुट जनता एक्स्प्रेसमध्ये चढताच खास खबर्‍यांनी पोलिसांना सतर्क केल्यानंतर तीन्ही संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना नवजीवन एक्स्प्रेस घटनेचे सीसीटीव्हीफुटेज दाखवल्यानंतर त्यांनी नवजीवन एक्स्प्रेसमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here