काळ्या बाजारातील गॅस विक्री प्रकरणी एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; ५४ गॅस सिलेंडरसह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध गॅस रिफिलींग आणि काळ्या बाजारात गॅस विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आहे. या कारवाईत ५४ गॅस सिलेंडरसह १ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

८ फेब्रुवारीला एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रामेश्वर कॉलनीत किरण भागवत पाटील घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विक्री करत आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना दिली.पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष पथक तयार केले. या पथकाने रामेश्वर कॉलनीतील एका घरावर छापा टाकला आणि संशयित आरोपी किरण पाटील याला अटक केली.

 

या कारवाईत पोलिसांनी एकूण ५४ गॅस सिलेंडर्स जप्त केले. यात २२ घरगुती गॅस सिलेंडर, ३२ व्यवसायिक गॅस सिलेंडर, गॅस रिफिलींगसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक प्रेशर मोटर अशा १ लाख ६४ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालाचा समावेश आहे.

 

पोलिसांनी आरोपी किरण भागवत पाटील याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम २८७ आणि जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत कलम ३.७ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, ११ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here