युवा विद्यार्थ्यांनी जाणून घेतला केंद्रीय अर्थसंकल्प

अर्थसंकल्प

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चा उपक्रम

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : युवा पिढीला विद्यार्थीदशेतच केंद्रीय अर्थसंकल्पाचे महत्त्व आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती व्हावी या उद्देशाने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस ) तर्फे अर्थसंकल्पावरील तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

 

व्याख्यानमालेतील पहिल्या सत्रात अर्थसंकल्पपूर्व चर्चेत केंद्रीय अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा, संभाव्य वित्तीय धोरणात्मक बदल,जीडीपी वाढीचा अंदाज, कर प्रणालीतील सुधारणा, वित्तीय तुट रोखण्यासाठीच्या उपाययोजना आदींबाबत प्रा. महेश महांकाळ यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे प्रत्यक्ष सादरीकरण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.कर आकारणी, पायाभूत सुविधा, समाजकल्याण, शिक्षण आणि डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय घोषणांचे विद्यार्थ्यानी उत्कटतेने निरीक्षण केले.या सत्रामुळे विद्यार्थ्यांना सरकारी योजनांचा प्राधान्यक्रम समजून घेता आला तसेच वित्तीय उपायांवर विश्लेषणात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत झाली. तर व्याख्यानमालेच्या अंतिम सत्रात अर्थसंकल्पोत्तर विश्लेषण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रातॲड. सुकृत देव यांनी विद्यार्थ्यांना अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबींचे विश्लेषण केले.

 

या व्याख्यानमालेमुळे विद्यार्थ्यांना वित्तीय धोरणे आणि आर्थिक नियोजनातील गुंतागुंत समजण्यास मोठी मदत झाली.ही अर्थसंकल्पीय व्याख्यानसत्र मालिका एक शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण उपक्रम असल्याचे सांगत या व्याख्यानसत्र मालिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल एक सर्वांगीण दृष्टी निर्माण झाली,त्यांच्यातील आर्थिक कुशाग्रता, विश्लेषणात्मक कौशल्ये आणि धोरणात्मक जागरूकता विकसित करण्यात मदत झाली,जी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप उपयुक्त ठरेल, असे मत आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.विशेषतः व्याख्यानमालेतील प्रश्नोत्तर सत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांना जाणवणाऱ्या शंका आणि प्रश्नांची तज्ञांकडून उत्तरे मिळाल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.या व्याख्यानसत्र मालिकेचे आयोजन प्रा.महेश महांकाळ आणि प्रा.डॉ.मधुरा देशपांडे यांनी केले होते. संस्थेतील एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीएच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या व्याख्यानमालिकेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here