मोटारसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगार शिरुर पोलिसांनी केला जेरबंद; साडेसहा लाखाच्या दुचाकी जप्त

शिरुर पोलिसांनी केला जेरबंद

अहिल्यानगर (उपसंपादक प्रविण वराळ) : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहने चोरून धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मोटर सायकल चोरीचे तब्बल ११ गुन्हे उघडीस आणून ६ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

संतोष उर्फ शरद गजानन इंगोले (रा. पांगरी कुटे, ता. मालेगाव, जि. वाशिम) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी बजावली आहे. ही धडाकेबाज कारवाई केल्याने शिरूर पोलिसांचे शिरूर शहर व परिसरातून कौतुक होत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथक शिरूर शहर व पोलीस हद्दीतील मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटर सायकलींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार विजय शिंदे व नितेश थोरात यांना मिळालेल्या गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे सराईत संतोष उर्फ शरद इंगोले याचा मोटर सायकल चोरीमध्ये सहभाग असल्याची महिती मिळाली.

या माहितीची खात्री करून आरोपी असलेल्या मालेगाव, जि. वाशिम परीसरात शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता आरोपीने शिरूर पोलीस स्टेशन १, घाड पोलीस स्टेशन, जि. बुलढाणा १, चाकण पोलीस स्टेशन १, भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन १, लोणीकंद पोलीस स्टेशन १, खडकी पोलीस स्टेशन १, आळंदी पोलीस स्टेशन २, महाळुंगे पोलीस स्टेशन १, दिघी पोलीस स्टेशन व इतर एक असे एकुण ११ गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीतील ११ दुचाकी तसेच ६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन आरोपीविरोधात जळुका, मालेगाव जि.वाशिम, पातुर जि.अकोला, जामनेर जि. जळगाव, लोणार, मेहकर जि. बुलढाणा येथील पोलिस स्टेशन येथे दुचाकी चोरी संदर्भातील एकुण सात गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विशाल कोथळकर करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विशाल कोथळकर, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here