जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवी बाब म्हणजे, अपघातात मृत्यू झालेला तरुण आपल्या मित्रासोबत बारावी परीक्षेसाठी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावात येत होता. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमाळा गावातील गौरव अशोक पाटील (वय १८) हा बारावीची परीक्षा देणार होता आणि त्यासाठी जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी फार्मसीच्या प्रथम वर्षांत शिक्षण घेत असणारा मोहित संजय मोरे (वय २०, रा. उमाळा, ता. जळगाव) सोबत जळगाव येथे येत होता.
दुपारी १ वाजेच्या सुमारास, रेमंड चौफुली जवळ एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे तरुण रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोहित मोरेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन व वाहनचालकाचा तपास सुरू आहे.







