भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : येथील रहिवासी असलेल्या एका विवाहितेवर फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्यासह पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत जळगावातील हॉटेल प्रगती पॅलेसमध्ये अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी सोमवारी (दि.१०) दुपारी जळगावातील शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी व फिर्यादीच्या पतीकडून पैसे घेतले, त्यानंतर पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत भुसावळ शहरातील ३२ वर्षीय महिलेला जळगाव शहरातील हॉटेल प्रगती पॅलेस येथे नेत संशयित आरोपी विनोद रामचंद्र पाटील (जळगाव) याने अत्याचार केला. हा प्रकार ८ जुलै २०२२ ते १२ जून २०२३ दरम्यान घडला.
या संदर्भात पीडित महिलेने अखेर सोमवारी (दि.१०) दुपारी शनिपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी विनोद रामचंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दारी करीत आहेत.







