जळगाव (उपसंपादक नंदुआप्पा पाटील) : येथील साईनगर कुसुंबा येथे राहणारे स्वप्नील गोविंदा राठोड यांनी त्यांचे मालकीचा ९ लाख रुपये किंमतीचा अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती मालवाहु वाहन (क्रमांक एम एच 19 सी एक्स 0390) हे दिनांक 21/01/2025 रोजी सायंकाळी 07-00 वाजता घरासमोर लावले. दिनांक 22/1/2025 रोजी सकाळी ६ वाजता त्यांना सदर मालवाहू वाहन चोरी गेल्याबाबत लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्र.54/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाढत्या वाहन चोरींना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी यांनी चोरीच्या गुन्ह्यांबाबत सखोल तपास करण्याकामी पोलीस स्टेशनला वेळोवेळी मार्गदर्शन केलेले आहे. त्याप्रमाणे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जावुन आजुबाजुच्या परीसरात माहीती घेणे, सीसीटीव्ही तपासणेबाबत अपर पोलीस अधिक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपाविभाग संदीप गावीत यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपासकामी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना किशोर पाटील, पोकॉ योगेश घुगे, सिध्देश्वर डापकर, नितीन ठाकुर यांना सीसिटीव्ही तपासणी करण्यास सांगितले. घटनास्थळावरील सीसिटीव्ही बारकाईने तपासले असता सदर गुन्ह्यातील वाहन चोरी करतांना आरोपीतांने ओळख पटु नये म्हणुन तोंडावर मास्क लावुन बनावट चावीने वाहनाचे लॉक उघडुन वाहन सुरु करुन नेल्याचे दिसत होते. मात्र ही चोरी ओळखीच्याच व्यक्तीने केलेली असावी असा दाट संशय पोलीसांना आला व त्यांनी त्यादिशेने तपास सुरु केला.
पोकॉ सिध्देश्वर डापकर यांना गोपनिय माहीती मिळाली की, सदरचे वाहन असरार शेख मुक्तार शेख (वय २५), मुश्ताक हसन सैय्यद (वय ४२, दोन्ही रा. अक्सा नगर मास्टर कॉलनी जळगाव) यांनी केलेली असून आरोपी मुश्ताक सैय्यद हा फिर्यादी स्वप्नील राठोड यांच्याकडून भाड्याने नेहमी वाहन नेत असे. त्यानेच बनावट चावी बनवुन मित्र असरार शेख याच्या मदतीने सदर वाहन चोरी करुन नेले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार वरील पोलीस तपास पथकाने दोन्ही आरोपीतांना पळुन जाण्याची संधी न देता घरातून ८ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे. त्यांची न्यायालयाकडुन पोलीस कोठडी घेवून सखोल चौकशी करता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले मालवाहू वाहन छोटा हत्ती हस्तगत करण्यात आले आहे. सदर आरोपीतांना न्यायालयाकडुन १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आलेली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना किशोर पाटील, पोकॉ योगेश घुगे हे करीत आहेत.
सदर गुन्हा हा पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक जळगाव अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव उपाविभाग संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना किशोर पाटील, पोकॉ योगेश घुगे, सिध्देश्वर डापकर, नितीन ठाकुर यांनी उघडकीस आणला आहे.







