इथे सिगरेट पिऊ नको सांगितल्याचा राग आल्याने दोघांवर ब्लेडने सपासप वार

ब्लेडने सपासप वार

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : येथे पिंपरीमध्ये तीन मित्र अंडाभुर्जी खात असतांना, बाजूला एक तरुण सिगारेट ओढत होता. त्याला बाजूला जाऊन सिगारेट ओढ, असे सांगितल्याचा राग आल्याने, त्याने ब्लेडने दोघांवर वार करत खून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिंदे आणि त्यांचे मित्र पुष्कर व उदय हे शुक्रवारी रात्री कुदळवाडी येथे अंडाभुर्जी खाण्यासाठी गेले होते. अंडाभुर्जी खात असताना तिथेच जफर हा सिगारेट ओढत होता. त्याला ‘बाजूला जाऊन सिगारेट ओढ’, असे गणेश यांनी सांगितले. त्या कारणावरून जफर याने गणेश आणि त्यांच्या मित्रांसोबत वाद घातला. पुष्कर आणि उदय यांच्यावर ब्लेडने वार करत खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले.

 

गणेश शिंदे (२४, रा. चिखली) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुष्कर नेवाळे, उदय ताले अशी जखमींची नावे आहेत. फिर्यादीवरून पोलीसांनी जफर अहमद शोहराबअली शाह (२८, रा. कुदळवाडी, चिखली) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिस उपनिरीक्षक राजेश मासाळ अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here