पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हा ज्या ठिकाणी घडला, त्याच ठिकाणी आरोपींची धिंड काढण्याचा नवा पद्धत पुणे पोलिसांनी अवलंबली आहे. मात्र, अजूनही काही स्वयंघोषित भाई सुधारत नसल्याने पोलिसांनी त्यांना कडक इशारा दिला आहे. महिलांची छेडछाड कराल किंवा सार्वजनिक ठिकाणी कोयते फिरवाल, तर भर चौकात चोप दिला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर कठोर कारवाईसाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना थेट निर्देश दिले आहेत—”गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा.” त्यानुसार पुणे पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. येरवडा, कोंढवा आणि इतर भागांतही पोलिस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कोयते फिरवणे, महिलांची छेडछाड करणे आणि रोड रोमिओगिरी यासारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा “धिंड पॅटर्न” प्रभावी ठरत आहे.
ज्या भागात आरोपींनी दहशत माजवली, त्याच भागात त्यांना फिरवून पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार आणि गावठी कट्टा पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत. धिंड काढताना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की, जर कोणी महिलांची छेडछाड केली किंवा उघडपणे कोयते फिरवले, तर त्यांना भर चौकात चोप दिला जाईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.







