नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : शहरात अनेक ठिकाणी डान्सबार, सर्विस बार, या आस्थापना आहेत. या चालू ठेवण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या देवेश मिश्रा या पत्रकाराविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेश मिश्रा हा नेरुळ परिसरातील शिरवणे गावातील बार चालकांना बार सुरू ठेवण्यासाठी फोनवरून पैशांची मागणी करत होता. जर पैसे दिले नाही तर बारचे फोटो ट्विटरवर ट्विट करून तसेच बातम्यांमध्ये प्रसारीत करण्याची धमकी देत बार चालकांकडून दरमहा २ हजार ते ४ हजार रुपयांची मागणी करत होता.
देवेन मिश्रा याच्या या वागणुकीला त्रस्त होऊन अखेर नेरुळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बार चालकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पत्रकार म्हनवणाऱ्या देवेन मिश्रा याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर देवेन मिश्र याने एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत देखील बाबा पॅलेस या बारमध्ये अशाच प्रकारे धमकी देऊन पैशाची मागणी केल्याने देवेन मिश्रा याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.







