पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन तरुणांना पाच लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी उत्तराखंडमधील एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रवींद्र जनार्दन बिलाडे (वय २३, रा. बोरकुल, धुळे) याने बंडगार्डन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोहित रामसिंग धामी (रा. उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बिलाडे याची एका त्रयस्त व्यक्तीमार्फत गेल्या वर्षी धामी याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी धामीने लष्करी रुग्णालयात नोकरी करत असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. बिलाडे आणि त्याचा मित्र दीपक रोकडे यांना लष्करात नोकरी लावण्याचे आमिष धामीने दाखविले. नंतर धामीने बिलाडेकडून दोन लाख ८० हजार रुपये घेतले, तसेच त्याचा मित्र रोकडे याच्याकडून दोन लाख रुपये घेतले.
दोघांनी त्याला एकूण मिळून चार लाख ८० हजार रुपये दिले. नंतर दोघांनी त्याच्याकडे लष्करातील नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिलाडेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक निरीक्षक मोहिते अधिक तपास करत आहेत.







