पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : मद्यपान केल्यानंतर मोटामधील साउंड सिस्टीम जोरात वाजवत धिंगाणा घालणे चौघांच्या अंगलट आले आहे. बीट मार्शलवर दादागिरी करत, दोघांपैकी एकाची कॉलर पकडल्याने चंदननगर पोलिसांनी चौघांना अटक केली.
ही घटना वडगावशेरी येथील सोपान नगर येथे घडली.स्वप्नील संजय काळदाते (२५, रा. भिंगार, अहिल्यानगर), अक्षय अशोकराव इंगोले (२९, रा. परभणी), समीर गौतम डंबाळे (२२, रा. गणेशनगर, बोपखेल) आणि अभिजीत राजेंद्र निकम (२०, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अंमलदार अजित कोकाटे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली. पोलिस अंमलदार अजित कोकाटे हे चंदननगर पोलिस ठाण्यात बीट मार्शल आहेत.
१० फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील सोपान नगर परिसरात चारजण मद्यपान करून धिंगाणा घालत असल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानुसार कोकाटे सहकार्यासोबत घटनास्थळी गेले. दरम्यान चारजण मद्यधुंद अवस्थेत कारमधील साऊंड सिस्टिमवर नाचत धिंगाणा घालत होते. तेव्हा चौघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करत, पोलिसाची कॉलर पकडत दादागिरी केली. परिसरात दहशत माजवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.







