शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीमध्ये आज (१३ फेब्रुवारी) चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यास सुरूवात झाली. त्यानंतर खंडोबा मंदिरासमोर आरती करण्यात आली. यंदा फुलांनी सजवलेला साईचा रथ महंत रामगिरी महाराज, काशीकानंद महाराज आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते ओढण्यात आला.
यंदाचे परिक्रमेचे सहावे वर्ष : गेल्या पाच वर्षांपासून शिर्डीतील ग्रीन एन फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलीस, महसूल विभाग आणि साईभक्त यांच्या संयुक्त विद्यमानं १३ फेब्रुवारी रोजी शिर्डीत परिक्रमा महोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचं या परिक्रमेचं सहावं वर्ष असून देश, विदेशातील हजारो साईभक्त पायी चौदा किलोमीटरच्या साई परिक्रमा सोहळ्यात सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी महिलांची आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होती.
दीपक केसरकर यांची ही परिक्रमेला हजेरी : १४ किलोमीटरच्या परिक्रमा मार्गावर ८० ठिकाणी शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांनाकडून परिक्रमेत चालत असलेल्या भाविकांसाठी चहा, नाश्ता, विविध फळे आणि पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती. या परिक्रमेत राज्य आणि परराज्यातील लहान-मोठे १५ रथ सहभागी झाले होते. रतलाम येथील ५०० भाविक रथ, छत्र, घेऊन सहभागी झाले होते. तर परिक्रमेला माजी मंत्री दीपक केसरकर यांनी देखील न चुकता याहीवर्षी हजेरी लावली.
मार्च २०२० ला शिर्डी परिक्रमेचा श्रीगणेशा : धार्मिक तीर्थक्षेत्राची नगर प्रदक्षिणा केल्याने उर्जा तसंच पुण्य मिळते अशी भाविकांची धारणा असते. यामुळं शिर्डीत आलेले काही भाविक साई दर्शनानंतर शिर्डीची नगर प्रदक्षिणा करत असतात. प्रथम वर्षात १५ मार्च २०२० रोजी या शिर्डी परिक्रमेचा श्रीगणेशा करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी यात सहभाग घेत आकर्षक देखावे तसंच साईबाबांचा रथ अशी जंगी फेरी काढण्यात आली होती.







