प्रयागराज (उत्तर प्रदेश) : येथे सुरु असलेल्या महाकुंभात लाखों भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान एका भीषण अपघातात बोलेरो गाडी आणि बसची धडक झाली आहे. या भीषण अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर १९ प्रवाशी जखमी झाले आहेत. मृत सर्व प्रवासी बोलेरोमधून प्रवास करत होते.
प्रयागराज- मिर्झापुर हायवेवर बोलेरो आणि बसचा भीषण अपघात झाला. छत्तीसगडमधील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजच्या दिशेने चालले होते. मात्र काळाने त्यांच्यावर महाकुंभला जाण्याआधीच घाला घातला आहे. यामध्ये १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हे १९ प्रवासी बसमधून प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी मध्यप्रदेशमधील राजगड जिल्ह्यात राहणारे प्रवासी होते.
अपघाताची माहिती कळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कारवाईस सुरुवात केली. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.