सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : राज्यात १२ वी नंतर आता १० वीच्या देखील परीक्षा सुरू झाल्या असून कॉपीमुक्त अभियानासाठी सरकार व प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, तरीही अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कॉपीच्या माध्यमातून मदत करण्यात येत असल्याचं दिसून येतं.
इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने काही शिक्षक हे उत्तर लिहून देण्याच्या तयारीत असल्याचा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यात सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एका रिक्षात बसून एक शिक्षक आणि दोन महिला शिक्षकांकडून हा कॉपीचा गैरप्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. आता, व्हायरल व्हिडिओच्या चौकशीनंतर व्हिडिओतील शिक्षिका व शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षात बसून कॉपी पुरविण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षिका आणि एका शिक्षकाची क्लिप काल जळगावमधील सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्र बाहेरची ही क्लीप असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कॉपी पुरविण्याच्या तयारीत असलेल्या दोन शिक्षिकांमध्ये एक महिला शिक्षक या सरदार वल्लभाई पटेल विद्यालयाच्या मुख्याध्यापक असल्याचे समोर आले
दरम्यान, या क्लिपचा तपास केला असता इयत्ता दहावीच्या मराठीच्या पेपरच्या दिवशी हा प्रकार झाला असल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







