पेरुत शॉपिंग मॉलचे छत कोसळले; ६ मृत तर ७८ जखमी

शॉपिंग मॉलचे छत कोसळले

लीमा (वृत्तसंस्था) : पेरूच्या वायव्य भागात एका शॉपिंग मॉलच्या फूड कोर्टचे छत कोसळले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, ७८ जण जखमी आहेत. संरक्षणमंत्री वॉल्टर एस्टुडिलो यांनी यासंदर्भात माहिती दिली.

पेरूच्या ला लिबर्टाड भागातील ट्रुजिलो शहरात ’रिअल प्लाझा ट्रुजिलो’ शॉपिंग मॉल आहे. फूड कोर्ट ही मॉलमधील एक जागा आहे, जिथे विविध रेस्टॉरंट्स आणि भोजनालये आहेत. त्याच ठिकाणी शुक्रवारी रात्री लोखंडी छत कोसळले. त्यामध्ये शंभरहून अधिक लोक दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले.

सर्व जखमींना बाहेर काढत जवळच्या सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. पाच जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ७८ नागरिक जखमी आहेत. त्यामधील ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ४८ नागरिक रूग्णालयात उपचार घेत असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रुजिलोचे महापौर मारियो रेयना यांनी शॉपिंग मॉल बंद करण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here