पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : खेड तालुक्यातील बहुळ येथे सोमवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. यावेळी प्रतिकार करणार्या दाम्पत्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दाम्पत्यासह वृद्ध महिला जखमी झाली. बहुळ गावच्या हद्दीतील फुल सुंदरवस्ती परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत शालन जयराम वाडेकर (वय-६५), अशोक जयराम वाडेकर (वय-३५) व उज्वला अशोक वाडेकर (वय- ३२) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी जयराम लक्ष्मण वाडेकर (वय-६७) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पाच ते सहा दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा तोडून वाडेकर यांच्या घरात प्रवेश केला. वाडेकर यांना पत्र्याच्या पेटीचा आवाज आल्याने जाग आली. त्यावेळी २० ते २५ वयोगटातील दरोडेखोर हातात चाकू घेऊन त्यांच्याजवळ बसला होता. गप्प राहा, नाहीतर ठार मारेन, अशी धमकी देत त्याने त्यांना हलण्यास मज्जाव केला. दरम्यान, इतर दोन चोरटे खोलीतील कपाटे आणि पेट्या फोडत होते. हॉलमध्ये झोपलेल्या शालन वाडेकर यांना आवाजामुळे जाग आली. त्यांनी चोरट्यांना काय घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला मारू नका, अशी विनवणी केली. तर, चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावले.
यानंतर चोरट्यांनी अशोक आणि उज्वला यांच्या खोलीचा दरवाजा तोडला. या दोघांनी प्रतिकार करताच दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केला. दरम्यान, आरडाओरड ऐकून शालन वाडेकर यांनी मुलाला व सुनेला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी एका दरोडेखोराने त्यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर, दरोडेखोर सव्वा लाखांचे दागिने आणि १२ हजारांची रोख रोकड घेऊन पसार झाले. दरोड्याची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांसह चाकण पोलिसांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.







