ठाणे (महाराष्ट्र राज्य सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) : एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या वेदना न पहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्या दोघींनी त्या मुलीचा मृतदेह हा साताऱ्याला गावी नेला आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असाही दावा करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांच्या अल्पवयीन लेकीचा जीव घेतला. ती मुलगी ही जन्मापासूनच अपंग आणि गतिमंद होती. तिला १५ फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या. तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने १९ फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या जास्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यशस्वीचा मृत्यू झाला. यानंतर आई आणि आजीने एका गाडीने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील परसणी गावात नेला. तिकडे या दोघींनी यशस्वी हिच्यावर अंत्यसंस्कार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेचा एक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. अल्पवयीन मुलीची आी, तिची आजी आणि त्या मुलीच्या आईची मैत्रीण अशा तिघींनी त्या अल्पवयीन मुलीला चादरीत गुंडाळून एका खाजगी गाडीमधून साताऱ्याला नेलं असं त्या सीसीटीव्हीमध्ये दिसलं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे खळबळ माजलेली असतानाच त्या मुलीच्या वडिलांनी, राजेश पवार यांनी मात्र पोलिसांनी केलेला गुन्हा हा खोटा असल्याचा आरोप केला आहे.
माझ्या मुलीला उपचारासाठी साताऱ्यातील वाई या भागात नेण्यात येत होतं. पण रस्त्यात तिला काय झालं हे मला माहित नाही. आणि त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार त्या ठिकाणीच करण्यात आले, असा दावा पवार यांनी केला. माझी देखील चौकशी करण्यात आली, मात्र मी पोलिसांना याबाबतचा खुलासा दिला. माझी मुलगी गेल्या १७ वर्षांपासून मतिमंद आहे. जर बाप १७ वर्ष सांभाळू शकतो, तर असं कृत्य करू शकतो का? असा सवालही पवार यांनी विचारला. माझी मुलगी गतिमंद असल्याने ती रात्रीच्या सुमारास उठायची आणि आरडाओरडा करायची त्यामुळे तिला झोपेची गोळी दिली होती. गेल्या चार दिवसांपासून माझी मुलगी जेवण नव्हती करत त्यामुळे तिला उपचारासाठी सातारा हा भागात नेण्यात येत होत,असा दावाही त्यांनी केला.







