पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत बलात्कारानंतर आरोपीने पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता २६ वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने त्याला सांगितलं. मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. तू टॉर्च लावून आत मध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय.







