मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मुंबईसह राज्यभरात विविध उपक्रमांमधून भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणीबाबत विशेष जबाबदारी दिली असून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मात्र, याचाच फायदा सायबर भामट्यांनी घेऊन आता भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपच्या शिवडीतील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून दिल्लीतून पोलिसांनी सरबजीत सिंग याला अटक केली आहे.
सरबजीत सिंगकडून दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. शिवडीतील तक्रारदार भाजपच्या पदाधिकाऱ्याला १२ फेब्रुवारीच्या रात्री मोबाईलवरील सोशल मिडियावर एक व्हायरल मेसेज आला. यात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियाना दरम्यान खासदार, आमदार, नगरसेवक अध्यक्ष किंवा अन्य पक्षातील पदाधिकारी यांना कमी किंमतीत रेफरल कोडद्वारे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून हवी असल्यास संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार शिवडीतील पदाधिकाऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअॅपवर माहिती मागवली असता पक्षाचे नाव चिन्हासह ‘सदस्यता मोहिम सर्वेक्षण ऑनलाईन सेवा’ असे दाखवण्यात आले.
त्याचबरोबर पुढे विश्वास पटावा यासाठी [email protected] या ईमेल आयडीचा वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, यामुळे पक्षातील पदाधिकारी नागरिक यांची फसवणूक केली जात असून, पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवडीतील त्या पदाधिकाऱ्याने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ३१८ (४) (फसवणूक) आणि ३१९ (२) (तोतयागिरी करून फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ड) आणि ७४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







