नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : देशभर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी होत आहे. मात्र, निफाड तालुक्यातील नैताळे येथील द्राक्षे उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी अनोख्या पद्दतीने महाशिवरात्री साजरी केली आहे. द्राक्षे बागायतदार संघाने महाशिवरात्री हा ‘द्राक्षेदिन’ साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार ‘द्राक्षेदिन’ व महाशिवरात्री यांचा दुग्धशर्करा योग म्हणून त्यांनी आपल्या द्राक्षे बागेत द्राक्षे मण्यांपासून शिवशंकराची पिंड बनवून त्याची यथासांग पूजा अर्चा करून महाशिवरात्री साजरी केली.
संजय साठे हे प्रगतिशील शेतकरी असून ते आपल्या शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. या माध्यमातूनच त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई येथे भेट घेण्याचा योग आला होता. गणेशोत्सव काळात त्यांनी कांद्यापासून गणेशमूर्ती साकारून तिची प्रतिष्ठापना केली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी द्राक्षे घड, तसेच कांद्याची गुढी उभारून शेतमालाचा अनोखा सन्मान केला होता. त्यांनी विकलेल्या कांद्याचे अवघे २६५ रु.शिल्लक राहिल्याने त्यांनी मराठमोळे टोपी उपरणे व ती रक्कम चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर करून निषेध नोंदवला होता. त्याचप्रमाणे या वर्षी पासून महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी द्राक्ष बागायतदार संघाने शेतकऱ्यांनी ‘द्राक्षे दिन’ साजरा करावा असे आवाहन केले.
त्यांच्या अवाहनानुसार संजय साठे यांनी महादेवाची काळ्या आणि सफेद द्राक्षेमण्यांपासून पिंड बनवून त्याची शेतात विधिवत पूजा केली. यातून त्यांनी द्राक्षे बागायतदार संघाचे आवाहन व महाशिवरात्री यांची अनोखी सांगड घालत शेतमालाचा अनोखा सन्मान केला.
द्राक्षे खा निरोगी रहा
आयर्वेदात महत्व असलेल्या द्राक्षांत केमिकल असल्याचा गैरसमज पसरवला जातो. मात्र द्राक्षे पिकाला अवघ्या ६० दिवसांपर्यंत फवारणी केली जाते. द्राक्षे निर्यात करतांना केमिकल विरहित द्राक्षे निर्यात केली जातात त्यासाठी त्यांना अनेक चाचण्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः घातक केमिकलवर सरकारने बंदी देखील आणली आहे. त्यामुळे द्राक्षांविषयी गैरसमज करून न घेता आरोग्यासाठी चांगले असणारे ‘द्राक्षे खा, निरोगी रहा..’







